
वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट देण्याचा आदेश धनंजय मुंडे यांनी दिला असेल – वडेट्टीवार यांचा आरोप
नागपूर : महिला अत्याचार विरोधात महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता. पण राष्ट्रपतींची स्वाक्षरी न झाल्यामुळे ही विधेयक मागे घेतले जाणार आहे, हे महायुती सरकारचे अपयश आहे. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना शक्ती कायद्याची आवश्यकता आहे. अस असताना राष्ट्रपतींची स्वाक्षरी का झाली नाही, सरकारची भूमिका खेदजनक आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात शक्ती विधेयक सरकारने पुन्हा आणावे, त्यांना वाटतात त्या आवश्यक सुधारणा करून विधेयक आणावे आणि राष्ट्रपतींकडे पुन्हा पाठवावे अशी मागणी विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना महायुती सरकार मधील मंत्री असंवेदनशील वक्तव्य करत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री सावकारे यांची विधान ही आरोपीला वाचवण्यासाठी केली आहेत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. महिलेवर अत्याचार झाला असताना तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे आरोपीची पाठराखण करणे आहे. आपल्या मंत्र्यांच्या या भूमिकेशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहमत आहेत का? त्यामुळे बोलताना थोडी तरी लाज बाळगावी अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होत आहे, वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे सोबती आहेत. मुंडे मंत्री असल्यामुळे त्यांनीच वाल्मीक कराड याला तुरुंगात त्रास होऊ नये म्हणून आदेश दिले असतील. म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते, अस देखील विधीमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.
हे सरकार येऊन जो कारभार सुरू आहे ते जनता बघत आहे. मुख्यमंत्री शंभर दिवस कामकाजाचा आढावा घेतात. पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. सरकार मधील मंत्रीच वादग्रस्त विधान करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे त्याचा आढावा घेतला तर योग्य होईल, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.



