
गडचिरोली : “संत तुकारामांची कविता केवळ भक्तीपर नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. त्यांच्या अभंगांत अन्याय, अंधश्रद्धा, जातिभेद, कर्मकांड, लोभ आणि अहंकार यांच्यावर तीव्र टीका असून, सत्य, समता, दया आणि परोपकार यांसारख्या मूल्यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले,” असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठात आयोजित संत तुकाराम जन्मोत्सवातिल बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन सल्लागार समितीचे आजीवन सदस्य व सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी यांनी केले.
संत तुकाराम जन्मोत्सवानिमित्त ‘संत तुकारामांची सुभाषिते’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपीय आणि बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शांताराम बुटे, सल्लागार समिती सदस्य डॉ. संजीव कोंडेकर, डॉ. संतोष देठे (शिवाजी महाविद्यालय, राजुरा), डॉ. पद्माकर वानखेडे (नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी), डॉ. कैलास निखाडे (राजे विश्वेश्वरराव महाविद्यालय, भामरागड) आणि समन्वयक डॉ. हेमराज निखाडे आदी उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, “तुकारामांनी जातिव्यवस्थेतील अन्यायाला विरोध केला. ‘कर्म, धर्म नाही जाती, विचारू नका कुणाची मूळ’ या अभंगातून त्यांनी जातिभेदाच्या विरोधात ठाम भूमिका मांडली. तसेच, धार्मिक कर्मकांडांपेक्षा निस्वार्थ भक्ती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.”
या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या पाच महाविद्यालयांतील १५ विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम (रु. 2000), द्वितीय (रु . 1500) आणि तृतीय (रु. 1000) क्रमांकाचे रोख बक्षीस, ग्रंथ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच, स्पर्धा आयोजित केलेल्या महाविद्यालयांना संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी पाचही समन्वयकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित गजबिये यांनी केले, तर आभार डॉ. हेमराज निखाडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



