
पेठा येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण
एटापल्ली : देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आदिवासी समाजाचे शहीद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके हे आजच्या युवा पिढीचे आदर्श असावेत. त्यांच्या विरतेची गाथा सगळ्यांना माहित असायला पाहिजे आणि आज आदिवासी समाजाची संस्कृती, रूढी परंपरा व कला जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
एटापल्ली तालुक्यातील पेठा येथे 12 मार्च शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकामाचे उद्घाटक म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजांसोबत कठोर लढा दिला. त्यांचा हा संघर्ष आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आणि शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा हा आज उभारलेला पुतळा युवा पिढीला प्रेरणा देत राहील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहण आणि शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते अम्ब्रीशराव आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अम्ब्रीशराव आत्राम यांचे पेठा गावात आगमन होताच त्यांचे ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढत भव्य जंगी स्वागत गावकऱ्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला सरपंच वनिता कोरामी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी सत्यनारायण कोडापे, तालुका कृषी अधिकारी तुषार पवार, उपसरपंच प्रशांत आत्राम, भाजपा महामंत्री मोहन नामेवार, पोलीस पाटील दस्सा कोरमी, लालसू रापांज्जी, रैनू नरोटे, रैजू गावडे, नान्सू मटामी, रामा गोटा, साधू दुर्वा, प्रतिभा तोडेवार, साईनाथ वेलादी आणि मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.



