सती नदीपात्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
बंद केलेला प्रवेश मार्ग प्रभावित केल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हा

वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदारांनी प्रवेश मार्ग केला बंद
कुरखेडा : येथील सती नदी पात्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार रमेश कुंभरे यांनी नदीपात्रातील संभाव्य प्रवेश मार्ग अवरुद्ध करून बंद केला आहे. बंद केलेला सदर मार्ग बाधित करून सती नदी पात्रात प्रवेश करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना सर्व महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कुरखेडा मुख्यालयात महसूल तपास नाके स्थापन केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून पुरवठा केला जात होता. सदर गंभीर बाबींचा माध्यमांद्वारे बातम्या प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जात होत्या. २४ तास पहारा असतानाही होणारी वाळू तस्करी येथील महसूल प्रशासनासाठी आव्हान ठरत असल्याने सती नदी पात्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी नवले, कुरखेडा तलाठी ठाकरे, कोतवाल मयूर उईके यांनी तहसीलदार कुरखेडा यांच्या सूचनेवरून सती नदी पात्रात प्रवेश करण्यासाठी तस्करांनी तयार केलेल्या पोच मार्गात जेसीबीद्वारे खड्डे खोदून मार्ग अवरुद्ध केला आहे. कुरखेडा मुख्यालय लगतच्या कुंभिटोला, कुरखेडा चिलघर, चिचटोला, आंधळी, मालदुगी, जांभुळखेडा वाकडी, येथील पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर विशेष निगराणी करण्याच्या सूचना महसूल पथकास देण्यात आल्या आहेत.
महसूल विभागातील काही जयचंद वाळू तस्करांना गस्ती पथकाची माहिती पुरवून चिरीमिरी करीत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांना प्राप्त झाल्या असून या जयचंदांना तोंडी ताकीद देऊन सदर प्रकार बंद करून प्रशासनाशी प्रामाणिक राहण्यासाठी ठणकावण्यात आले आहे.



