
एकाच कुटुंबातील चार मुलांचा समावेश
चंद्रपूर : जिल्ह्यात नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी तलाव या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पाच मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. चिमूर तालुक्यातल्या साठगाव कोलारीचे रहिवाशी जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे हे एकाच कुटुंबातील चार जण होते, तर तेजस ठाकरे त्यांचा मित्र होता. बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ गावंडे कुटुंबातले आहेत.
मुलांनी घोडाझरी तलाव पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सहा जण या तलावात पोहोण्यासाठी उतरले असताना, तलावाच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर हिंगोलीचा आर्यन हेमराज हा केवळ बचावला. सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. तर एकाच गावातल्या पाच तरुणांचा मृत्यू झाल्याने व गावंडे कुटुंबातल्या चार मुलांचा मृत्यू झाल्याने गावावर आणि गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



