गडचिरोलीचंद्रपूरनागपूरविदर्भ

वीज ग्राहकांनो, तुमची ‘सुरक्षा ठेव’ तुमच्याच फायद्याची! महावितरणचे ‘अतिरिक्त ठेव’ भरण्याचे आवाहन

नागपूर परिमंडलातील ग्राहकांना मिळणार स्वतंत्र बिल; जमा रकमेवर मिळणार बँकेप्रमाणे व्याज

नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडलातील वीज ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या नियमित वीज बिलासोबतच आता ग्राहकांना ‘अतिरिक्त सुरक्षा ठेव’ भरण्याचे स्वतंत्र बिल प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत असून, ग्राहकांनी या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या नियमानुसार, ग्राहक आधी वीज वापरतात आणि त्यानंतर बिल भरतात. बिल मिळणे आणि भरणा करणे यात सुमारे ४५ दिवसांचा कालावधी जातो. या काळातील संभाव्य आर्थिक जोखीम टाळण्यासाठी वीज कायदा २००३ नुसार, प्रत्येक ग्राहकाकडून दोन महिन्यांच्या सरासरी बिलाइतकी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. ही रक्कम ग्राहकाच्या नावावर महावितरणकडे सुरक्षित असते.

विद्युत पुरवठा संहिता-२०२१ नुसार दरवर्षी या ठेवीची पुनर्गणना केली जाते. जर मागील वर्षात तुमचा विजेचा वापर वाढला असेल, तर दोन महिन्यांच्या सरासरीनुसार सुरक्षा ठेवीची रक्कमही वाढते. अशा वेळी जुनी जमा रक्कम वजा करून केवळ फरकाची रक्कम ‘अतिरिक्त सुरक्षा ठेव’ म्हणून मागितली जाते.

अतिरिक्त ठेव भरणे हे ग्राहकांसाठी बचतीसारखेच आहे, कारण: व्याज लाभ: तुमच्याकडे जमा असलेल्या या सुरक्षा ठेवीवर महावितरण दरवर्षी रिझर्व्ह बँकेच्या दराप्रमाणे व्याज देते (मागील वर्षी हा दर ६.७५ टक्के होता). बिलात सूट: हे व्याज दरवर्षी तुमच्या वीज बिलात समायोजित (Adjust) केले जाते, ज्यामुळे बिलाची रक्कम कमी होते. परतावा: वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही संपूर्ण रक्कम व्याजासह ग्राहकाला परत केली जाते.

ग्राहकांना ही अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी महावितरण कार्यालयात जाण्याची गरज नाही. लघुदाब ग्राहकांसाठी ही प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे: १. वेबसाइट: www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरणा करता येईल. २. मोबाईल ॲप: ‘महावितरण’ मोबाईल ॲपद्वारेही घरबसल्या पैसे भरता येतील.

“ही सुरक्षा ठेव रक्कम अंतिमतः ग्राहकांच्याच हितासाठी आणि वीज वितरण यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी वापरली जाते. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे,” असे आवाहन महावितरणच्या जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button