गडचिरोलीत खळबळ! उच्चपदस्थ नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची २.१६ कोटींची फसवणूक

पुण्यातील आरोपीला अटक; मंत्रालयातील मोठ्या ओळखीचा दिला होता हवाला
गडचिरोली : नक्षल हल्ल्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानाच्या मुलाला उपजिल्हाधिकारी (डेप्युटी कलेक्टर) बनवण्याचे स्वप्न दाखवून तब्बल २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून, फसवणुकीचा हा आकडा ऐकून पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.
फिर्यादी सागर गणपत मडावी (२७, रा. गडचिरोली) यांचे वडील २०१३ मध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. वडिलांच्या बलिदानानंतर अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळवण्यासाठी सागर प्रयत्नशील होता. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी वारे (रा. भोर, जि. पुणे) याच्याशी झाली. ज्ञानेश्वरने “मंत्रालयात माझे मोठे अधिकारी ओळखीचे आहेत, मी तुला थेट उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती मिळवून देतो,” असा विश्वास संपादन केला.
जानेवारी २०२४ पासून या फसवणुकीला सुरुवात झाली. ‘महाजन साहेब’ नावाच्या कथित बड्या अधिकाऱ्याचा हवाला देत आरोपीने पैशांची मागणी सुरू केली. सागरच्या कुटुंबीयांनी मुलाच्या उज्वल भविष्यासाठी विश्वास ठेवून फोनपे, आरटीजीएस आणि रोख स्वरूपात कोट्यवधी रुपये दिले. धक्कादायक म्हणजे, आरोपीने सागरचे एटीएम कार्डही स्वतःकडे ठेवून खात्यातून पैसे काढले. मुलाला नोकरी लावण्यासाठी त्याच्या आईने आपली मालमत्ता विकली, दागिने गहाण ठेवले आणि कर्ज काढून आरोपींची घरे भरली. तब्बल दोन वर्षे पैसे उकळल्यानंतरही जेव्हा नियुक्ती आदेश मिळाला नाही, तेव्हा सागरने विचारणा केली. त्यावर आरोपींनी “पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही” अशी उलट धमकी दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे सागरच्या लक्षात आले. या प्रकरणात ज्ञानेश्वर वारेसह अजय भगत, मुकेश यादव, संदीप कुमार आणि कथित महाजन साहेब यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर वारे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २६ एप्रिलपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आणखी किती तरुणांना असे लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
“शासकीय नोकरीसाठी कोणतीही समांतर किंवा पैशांची अधिकृत प्रक्रिया नसते. ओळखीच्या नावाखाली किंवा मंत्रालयातील सेटिंगच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा. सुशिक्षित तरुणांनी अशा आमिषांना बळी पडू नये. असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे. सुशिक्षित तरुण अशा रॅकेटमध्ये अडकत असल्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, या ‘ठगबाजांवर’ कठोर कारवाईची मागणी होत आहे.



