गडचिरोलीविदर्भ

१५ तासांनंतर बाहेर काढले ‘त्या’ मजुरांचे मृतदेह

यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न ; जानमपल्ली येथील विहीर दुर्घटना

सिरोंचा : तालुक्यातील जानमपल्ली गावातील शेतात विहीर खोदकाम करताना मातीचा कडा कोसळून त्याखाली दबल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. त्या दोघांचे मृतदेह तब्बल १५ तासांनंतर बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. दोघांवर ९ एप्रिलला सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवी अंकुलू उप्पुला (२८) व समय्या अमय्या कोंडा (३०) हे दोघे जानमपल्ली येथे एका शेतकऱ्याच्या शेतात ८ एप्रिल रोजी सिंचन विहिरीचे खोदकाम करत होते. सकाळी साडेनऊ वाजता वाळूचा थर लागला व विहीर कोसळली. यात हे दोघे दबले, तर संपत्ती कोनम हा मजूर कसाबसा वाचला. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण यश येत नव्हते. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे शोधकार्यात अडथळा आला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा जेसीबीद्वारे शोधकार्य सुरू केले, अखेर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास दोन्ही मृतदेह हाती लागले. ते विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. सकाळी ११ वाजता दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, तहसीलदार नीलेश होनमारे, उपअधीक्षक संदेश नाईक, सिरोंचा ठाण्याचे पो. नि. समाधान चव्हाण हे घटनास्थळी दिवसभर ठाण मांडून होते. सायंकाळी पावसाचा व्यत्यय आल्याने शोधकार्य काही वेळ थांबविले, पण नंतर जोखीम पत्करून दोघांना बाहेर काढले. तहान, भूक विसरून अधिकारी राबल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button