गडचिरोलीविदर्भ

प्रस्तावित विमानतळ पुलखलमध्येच होणार

6 गावांमधील 352 मालमत्ताधारक शेतकरी, नागरिक, ग्रामपंचायतींना जमीन खरेदीसंदर्भात नोटीस जारी

गडचिरोली : गडचिरोलीत होऊ घातलेल्या विमानतळासाठी प्रशासनाने नागरिकांचा विरोध डावलून मुरखळा-पुलखल भागातील जागा निश्चित केली आहे. त्यासाठी 6 गावांमधील 352 मालमत्ताधारक शेतकरी, नागरिक, ग्रामपंचायतींना जमीन खरेदीसंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे.

विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर सुपिक जमीन असल्यामुळे हे विमानतळ दुसऱ्या जागेत करावे अशी मागणी काँग्रेस, शेकाप आदींनी केली होती. तसेच ग्रामपंचायतनेही तसा ठराव दिला होता. मात्र त्याला न जुमानता विमानतळाची जागा तीच ठेवण्यात आली आहे.

या विमानतळासाठी एकूण 201.51 हे.आर. जमीन लागणार आहे. त्यात मुरखळा येथील 104 लोकांची एकूण 66.40 हे.आर. जमीन, पुलखल येथील 103 लोकांची 59.370 हे.आर. जमीन, नवेगाव येथील 17 जणांची 10.87 हे.आर.जमीन, मुडझा (बु) येथील 36 लोकांची 28.38 हे.आर. जमीन, मुडझा (तु) येथील 56 लोकांची 27.99 हे.आर. जमीन आणि कनेरी येथील 36 लोकांची 15.13 हे.आर. जमीन खरेदी केली जाणार आहे. म्हणजे एकूण 352 मालमत्ताधारकांची 201.51 हे.आर. जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या.नागपूर यांना या विमानतळासाठी दिली जाणार आहे.

विशेष भूसंपादन अधिकारी तथा गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव (भा.प्र.से.) यांनी यासंदर्भात दि.2 एप्रिल रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून संबंधित जमीनधारकांच्या मालमत्ताधारकांवर कोणाचा हक्क, हितसंबंध, बोजा, कर्ज, गहाण याबाबत काही आक्षेप, तक्रार असल्यास किंवा त्यासंदर्भात कोर्टात दाद मागितलेली असल्यास 15 दिवसांच्या आत आक्षेप नोंदविण्याचे सूचित केले होते. ही मुदत 16 एप्रिल रोजी संपली. मात्र किती मालमत्तांवर आक्षेप आले हे समजू शकले नाही. संबंधित खासगी लोकांच्या जमिनी वाटाघाटीद्वारे थेट ताब्यात घेण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button