
शिरपूर नाक्यावर धावत्या कारला लागली आग ; जीवितहानी टळली
देवरी : तालुक्यातील शिरपूर/बांध सीमा तपासणी नाक्यावर गुरुवारी (दि.१७) पहाटे ५:१५ वाजताच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार गावकऱ्यांनी अनुभवला. नागपूर वरून झारखंडला जातांना अचानक कार पेटल्याने मोठे नुकसान झाले आहे. देवरी येथिल अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिरपूर असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर दि.१७ एप्रिलला पाच व्यक्ती आपल्या डस्टर गाडीने नागपूर वरून झारखंडला काही कामानिमित्त जात असताना, शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली, मात्र जीवितहानी टळली.
या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. मात्र आगीचा मोठा भडका व कार सीएनजी असल्यामुळे कोणीही जवळ जाऊ शकले नाही. गावकऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अवघ्या काही मिनीटातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. यामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.



