गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला जखमी

धान पिकाचेही केले नुकसान ; कळपामध्ये १८ हत्तींचा समावेश 

गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून गडचिरोली वनपरिक्षेत्रात वावर असलेल्या रानटी हत्तींनी वाकडी व परिसरातील तीन-चार गावांमध्ये धुमाकूळ घालत तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे. यातील एकीला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे, तर अन्य दोघींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सुशीला टेमसू मेश्राम (४२), योगिता उमाजी मेश्राम (४०), पुष्पा निराजी वरखेडे (४०) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

मागील तीन-चार दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील वाकडी, म्हसली, कृपाळा व हिरापूर या गावांमध्ये रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. २६ एपिरळ रोजी सकाळी कृपाळा येथील १०-१२ महिला गावानजीकच्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. एवढ्यात जवळपास १८ हत्तींचा कळप तेथे पोहचला. यातील काही हत्तींनी तीन महिलांवर हल्ला चढविला. सुशीला मेश्राम या महिलेला एका हत्तीची धडक लागल्याने तिला मुका मार लागला. बेहोश अवस्थेत तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. अन्य दोघी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शिवाय हत्तींनी वाकडी येथील माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या तीन एकर शेतातील उन्हाळी धानपिकाची नासधूस केली. शिवाय म्हसली येथील यशवंत झरकर यांच्या शेतातील शेड उद्ध्वस्त केले. तसेच हिरापूर येथील तीन ते चार शेतकऱ्यांच्या पिकाचीही नासधूस केली. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे तालुका महामंत्री बंडू झाडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button