गडचिरोलीविदर्भ

कोरेगावात महिला शक्ती एकवटली ; दारूबंदी टिकवण्याचा निर्धार

मुक्तिपथ-शक्तीपथच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गावात शांतता कायम ; तंबाखूमुक्तीवरही भर

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे मुक्तिपथ आणि शक्तीपथ स्त्री संघटनेच्या सघन गाव भेटीदरम्यान दुसरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गावात प्रभावी दारूबंदी असल्याने शांतता टिकून आहे. ही शांतता कायम राहावी आणि पुन्हा दारूविक्री सुरू होऊ नये, यासाठी महिलांनी अधिक सतर्क राहून विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन मुक्तिपथ टीमने केले. यासोबतच, बैठकीत महिलांना खर्रा आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला.

ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीत मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी गर्भवती आणि स्तनदा मातांना खर्रा व तंबाखूच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच, लहान मुलांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे महत्त्व विशद केले. बैठकीत उपस्थित महिलांनी शक्तीवर्धक टॉनिकच्या गोळ्या घेतल्यानंतरचे आपले अनुभव सांगितले. या वेळी गावातील सक्रिय महिलांची एक यादी तयार करण्यात आली. बैठकीत मुक्तिपथ तालुका संघटक विनोद एल. कोहपरे, उपसंघटक मनिषा प्रधान आणि लेखाराम हुलके यांनी मार्गदर्शन केले. मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटना कोरेगावच्या अध्यक्षा महानंदा भोंडे, उपाध्यक्षा माधुरी पुराम, सचिव हेमलता मडावी, तेजस्विनी हेमके आणि इतर सदस्य या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सघन गाव भेटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्तिपथ गाव संघटना आणि मुक्तीपथ शक्तीपथ स्त्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली. यात गावातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आणि पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी कटिबद्धता दर्शविली. यानंतर, मुक्तिपथ टीम आणि महिला सदस्यांनी कोरेगावच्या जंगलात शोध मोहीम राबवून अवैध दारू बनवण्यासाठी साठवलेला मोहफुलाचा सडवा नष्ट केला. या मोहिमेत गावाचे पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परसरामजी मलगाम यांनी सक्रिय सहभाग घेतला.

मुक्तिपथ आणि शक्तीपथच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे कोरेगावातील महिला दारूबंदी टिकवण्यासाठी अधिक जागरूक आणि सक्रिय झाल्या आहेत, हे या बैठकीतून दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button