
गडचिरोली : गावातून शहरात आलेल्या प्रत्येकाला स्वतःचे घर असावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, जमिनीच्या आणि घरांच्या वाढत्या किमतीमुळे हे स्वप्न दिवसेंदिवस सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मात्र, जर महिलांच्या नावे प्लॉट असेल, तर घर बांधकामासाठी किंवा नवीन घर खरेदीसाठी शासनाकडून काही प्रमाणात सवलत दिली जाते. यामुळे पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र गडचिरोलीत दिसत आहे.
महिलांचा समाजात सक्रिय सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते. यात महिलांना अनेक बाबतीत पुरुषांच्या तुलनेत विशेष सवलती मिळतात. याच कारणामुळे अनेकजण महिलांच्या नावे प्लॉट खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.
महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास त्यांची आर्थिक बाजू अधिक सुरक्षित होते आणि त्या अधिक स्वावलंबी बनतात, असा विचारही यामागे असतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्य महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी करतात.
नवीन घर खरेदी करताना भरावे लागणारे मुद्रांक शुल्क हे घराच्या किमतीनुसार लाखो रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, महिलांना या शुल्कात विशेष सवलत मिळते. त्यामुळे या आर्थिक फायद्यासाठी अनेकजण महिलांच्या नावे घर खरेदी करतात.
याव्यतिरिक्त, भारतातील अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या महिला अर्जदारांना पुरुषांच्या तुलनेत कमी व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देतात. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावे प्लॉट खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामुळे कुटुंबाला दुहेरी फायदा मिळतो – एकतर मालमत्ता महिलेच्या नावे होते आणि दुसरे म्हणजे आर्थिक सवलतींचा लाभ मिळतो.



