गडचिरोलीविदर्भ

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची संधी

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, १० मे रोजी गडचिरोली येथे राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा व सिरोंचा येथेही लोकअदालत पार पडणार आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे आणि दिवाणी दावे तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी समझोत्याने निकाली काढली जाणार आहेत.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विशेषतः १३८ एन. आय. ऍक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे आणि बँकेशी संबंधित प्रकरणांचा समावेश असेल. यासोबतच दाखलपूर्व वाद तसेच मोबाईल/टेलिफोन कंपन्या, वीज वितरण कंपन्या, पतसंस्था, नगर परिषद आणि ग्रामपंचायत कर आकारणी संबंधित प्रकरणे देखील सामिल असणार आहेत.

लोकन्यायालयात दिलेला निर्णय हा न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणेच असतो आणि त्याची अंमलबजावणी करणे शक्य होते. या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या वेळेची, श्रमाची आणि पैशांची बचत होते. तसेच, दोन्ही पक्षकारांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे सचिव आर. आर. पाटील यांनी सांगितले आहे.

त्यामुळे, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button