सराईत चोरट्याला अटक, २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिरोंचा पोलिसांची मोठी कारवाई
सिरोंचा : सिरोंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार चालवलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत सिरोंचा पोलिसांनी ९ मे रोजी आकाश नागया कोत्तापल्ली (वय २०, रा. कोत्तापेल्ली, ता. सिरोंचा) या सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याने सिरोंचा व असरअली परिसरात ११ चोऱ्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आकाश कोत्तापल्लीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील वस्तूंसंदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने सिरोंचा आणि असरअली परिसरातील एकूण ११ चोरीच्या घटनांची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मालामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सिव्हिल कामाचे साहित्य, घरगुती वस्तू, कपडे आणि मोबाईल फोन्स यांचा समावेश आहे, ज्याची एकूण किंमत २ लाख ५१ हजार ७०० रुपये आहे.
या गुन्ह्यात आकाश कोत्तापल्लीचा एक साथीदार देखील सहभागी असून, तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि लवकरच त्याला अटक करून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्यसाई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे, ज्ञानेश्वर धोत्रे, नरेंद्र वांगाटे, प्रांजली कुलकर्णी, लावण्या जक्कन तसेच पोलीस शिपाई मनीष गर्गे, सुनील घुगे, राकेश नागुला, मानतेश दागम, सुनील राठोड आणि संतोष भताने यांचा मोलाचा सहभाग होता.
गडचिरोली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या घरांची आणि व्यावसायिक आस्थापनांची योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.



