
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा सिंचन योजना (TSP), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना तसेच ‘मागेल त्याला विहीर’ योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MGNREGA) आपल्या शेतात विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे. मात्र, दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी या विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही. आता खरीप हंगामा तोंडावर असताना शेतकऱ्यांना हे अनुदान देऊन त्यांना नवीन हंगामाच्या खर्चासाठी मदत करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून या सिंचन विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. शासनाच्या या योजनांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची तरतूद आहे. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थी प्रशासनाकडे निधीबाबत विचारणा करतात, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. या प्रक्रियेमुळे गरीब शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. हे अनुदान खरे तर मार्च महिन्यातच मिळायला हवे होते, परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजूनही ते रखडले आहे, असा आरोप ब्राह्मणवाडे यांनी केला.
जिल्ह्यात दोन पालकमंत्री असूनही शेतकऱ्यांची ही गंभीर अडचण दूर होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून, या महत्त्वाकांक्षी योजनांचा मूळ उद्देशच निष्फळ ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आणि लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे थकीत असलेले विहिरींचे पैसे त्वरित द्यावेत, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. येत्या आठ दिवसात जर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



