
अध्यक्षपदी विनोद खूणे, उपाध्यक्षपदी विनायक मेश्राम यांची अविरोध निवड
कुरखेडा: तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या सहकारी भातगिरणी सहकारी संस्था, कुरखेडाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पोरेड्डीवार गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनोद खूणे यांची अध्यक्षपदी, तर विनायक मेश्राम यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली.
यापूर्वीच संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध पार पडली होती. त्यामुळे खेमनाथ पाटील डोंगरवार, विनोद खूणे, विनायक मेश्राम, उद्धव गहाणे, मोनेश मेश्राम, गीता धाबेकर, शालीक मेश्राम, फिरोज पठान आणि वासूदेव सयाम हे नऊ सदस्य संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. आज झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीने पोरेड्डीवार गटाच्या एकमुखी वर्चस्वावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
ही निवडणूक जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडली.
निवडणूक निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक ऍड. उमेश वालदे, भातगिरणीचे प्रशासक सुशील वानखेडे आणि माजी पंचायत समिती उपसभापती नवनाथ धाबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस. सी. बूरले आणि व्यवस्थापक डी. बी. मंगर यांनी निवडणूक प्रक्रिया अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली.



