तेंदूपत्ता लिलावात घोटाळ्याचा भाजपाचा आरोप ; ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

अहेरी : तालुक्यात तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली असतानाच, आलापल्ली ग्रामपंचायतीसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने (भाजपा) केला आहे. लिलाव प्रक्रियेत कोणतीही पारदर्शकता न ठेवता ग्रामसेवकांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना तेंदूपत्ता युनिट दिल्याचे भाजपाने निवेदनात म्हटले आहे. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे.
भाजपाने दिलेल्या निवेदनानुसार, तेंदूपत्ता लिलावाबाबत वृत्तपत्रांमध्ये कोणतीही जाहिरात देण्यात आली नाही. तसेच, ग्रामसभा न घेता आणि आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता ग्रामसेवकांनी आपल्या संपर्कातील तेंदूपत्ता ठेकेदारांना बोलावून स्वतःच किंमत ठरवली आणि तेंदूपत्ता युनिट दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना तेंदूपत्त्याचा योग्य दर मिळू शकला नाही, असा आरोप भाजपाने केला आहे.
या तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेत मोठा घोटाळा करणाऱ्या ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपाने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, आलापल्ली ग्रामपंचायत पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, अभीजित शेंडे, अंकुश शेंडे, सागर बिट्टीवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



