गडचिरोलीविदर्भ

तेंदूपत्ता तोडताना सर्पदंश ; मूकबधिर मजुराचा मृत्यू

कोरची तालुक्यातील कैमुल येथील घटना

कोरची : कोरची तालुक्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांवरील वन्यप्राण्यांचे हल्ले सुरू असतानाच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तालुक्यातील कैमूल येथे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका मुकबधिर मजुराला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगनलाल सुदाराम मेश्राम (वय ५३) असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेमुळे मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सध्या कोरची तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक गरीब नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जात आहेत. मागील आठवड्यात रानडुक्कर आणि अस्वलाच्या हल्ल्यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले होते.

रविवारी पहाटे जगनलाल मेश्राम हे नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. पाने तोडण्यासाठी वाकले असता, एका विषारी सापाने त्यांच्या पायाला दंश केला. मात्र, ते मुकबधिर असल्याने मदतीसाठी आरडाओरड करू शकले नाहीत. घाबरलेल्या अवस्थेत ते घरी परतले आणि हातवारे करून त्यांनी आपली पत्नी, मुलगा आणि तीन मुलींना घडलेली घटना सांगितली. त्यांच्या हालचालींवरून कुटुंबीयांना विषारी सापाने दंश केल्याचे समजले. त्यांनी तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने जगनलाल यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

तेंदूपत्ता संकलनामुळे मिळणाऱ्या पैशातून अनेक गरीब कुटुंबे पावसाळ्याच्या दिवसात आपला उदरनिर्वाह करतात, तसेच मुलांचे शिक्षण आणि शेती संबंधित खर्च भागवतात. मात्र, जंगलात काम करताना त्यांना वन्यप्राण्यांचे हल्ले आणि सर्पदंशासारख्या धोक्यांचा सामना करावा लागतो. जगनलाल हे अत्यंत मेहनती आणि शांत स्वभावाचे होते आणि आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी आणि तेंदूपत्ता तोडणाऱ्या इतर मजुरांनी तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे मेश्राम कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button