
भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक देत सहायक अभियंत्यांना विचारला जाब
अहेरी : पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे विस्कळीत झालेला वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. उलट, त्यानंतर समस्यांमध्ये वाढच झाली आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि अपुऱ्या दाबाने कूलर, पंखेही नीट काम करत नसल्याने अहेरीतील नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून अहेरीतील बहुतांश भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधार, उकाडा आणि डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वीज उपकरणांवर अवलंबून असलेले सेतू केंद्र, झेरॉक्स सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरसारख्या व्यावसायिकांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक दिली आणि सहायक अभियंत्यांना जाब विचारला.
सुमारे ५० वर्षे जुन्या विद्युत वाहिन्यांवरच काम चालवले जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. शिष्टमंडळाने तातडीने विद्युत वितरण विभागाचे विभाजन करून विशिष्ट रोहित्रांवरील अतिरिक्त भार कमी करून सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, माजी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक विकास उईके आणि संजय पोहणेकर, शंकर मगडीवार, सूर्यकांत ठाकरे, श्रीनिवास संगमवार, महेश रामगिरकर, संतोष संगमवार, संतोष बुग्गावार, सिद्धेश सिडाम यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अहेरीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.



