
गोंदिया : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर वडेगाव/स्टेशन येथे अंगणवाडीत किशोरवयीन मुलींसाठी विशेष समुपदेशन व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मासिक पाळी आणि त्या संबंधित स्वच्छतेच्या महत्त्वावर जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी, मासिक पाळीच्या काळात किशोरवयीन मुली व महिलांना होणाऱ्या समस्या आणि स्वच्छतेचे महत्त्व यावर चर्चा करून जनजागृती करण्यात आली. शिबिराचा एक भाग म्हणून, किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर आणि संतुलित आहाराचे महत्त्व यावर सखोल समुपदेशन करण्यात आले. सोबतच, त्यांची हिमोग्लोबीन, सिकलसेल आणि थायरॉईडबाबत मोफत रक्त तपासणी देखील करण्यात आली, अशी माहिती आयुष्मान आरोग्य मंदिर वडेगाव/स्टेशनचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निखिल लंजे यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण समुपदेशन व तपासणी कार्यक्रमात उपकेंद्र वडेगाव/स्टेशनच्या आरोग्य सेविका पायल बनकर, आशा सेविका सुषमा बडोले, अंगणवाडी सेविका आरती शहारे आणि लॅब तंत्रज्ञ प्रणिता शहारे यांनी सक्रिय आरोग्य सेवा दिली.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निखिल लंजे यांनी मासिक पाळी दरम्यान पाळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या स्वच्छतेच्या टिप्सची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संसर्ग टाळण्यासाठी किशोरवयीन मुली आणि महिलांनी दर ३ ते ४ तासांनी सॅनिटरी पॅड बदलले पाहिजेत. मासिक पाळीच्या उत्पादनांना हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत. जळजळ आणि पुरळ टाळण्यासाठी स्वच्छ, सुती अंतर्वस्त्रांची निवड करणे आवश्यक आहे. जर पुन्हा वापरता येणारे कापडी पॅड वापरत असाल, तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून, वाळवून मगच वापरावे. नियमितपणे आंघोळ करावी आणि जननेंद्रियाचा भाग पाण्याने स्वच्छ करावा, तसेच तीव्र रसायनांचा समावेश असलेली उत्पादने वापरणे टाळावे. योग्य हायड्रेशन आणि संतुलित आहाराचे सेवन करावे आणि वापरलेल्या उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावावी. या महत्त्वाच्या टिप्सचे पालन केल्यास मासिक पाळीच्या काळात चांगली स्वच्छता बाळगणे निश्चितच शक्य होईल, असे डॉ. लंजे यांनी नमूद केले.
यावेळी आरोग्य सेविका पायल बनकर यांनी रात्रीच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला. मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव कमी असल्यासही रात्रीच्या वेळेस पॅड बदलणे गरजेचे आहे, कारण रात्रभर पॅड त्वचेच्या संपर्कात असल्याने सूक्ष्म जीवजंतूंमुळे संसर्ग होण्याची शक्यता असते, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आधी पॅड काढून, ते नीट एका पेपरमध्ये गुंडाळून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. पॅड न बदलताच अन्य कामांमध्ये स्वतःला गुंतवण्याची चूक करू नये, कारण आपल्या आरोग्यापेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नसल्याचे बनकर यांनी स्पष्ट केले.



