गोंदियाविदर्भ

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

अतिदुर्गम भागात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सूचना; स्वच्छता, औषध उपलब्धता आणि कर्मचारी शिस्तीवर भर

गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन तेथील स्वच्छता, सुरक्षा, औषध उपलब्धता, वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांशी संवाद यांसारख्या निर्देशकांची पाहणी सुरू केली आहे. याच अनुषंगाने, १० जून रोजी अर्जुनी मोरगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांनी अतिदुर्गम आणि जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र, गोठणगाव येथे आकस्मिक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सुरेश धुर्वे, विलास कारेवार, दीपक चव्हाण उपस्थित होते.

या भेटीदरम्यान डॉ. कांबळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोठणगाव येथील प्रसूतिगृह, प्रयोगशाळा, आंतररुग्ण वार्ड, औषधसाठा, लस साठवणूक केंद्र इत्यादींची पाहणी केली. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टीने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आतील व बाहेरील परिसराची नियमित स्वच्छता राखणे. सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नियमितपणे नोंदवणे. बाह्यरुग्ण सेवा (OPD) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना चांगल्या सोयी वेळेत उपलब्ध करून देणे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे. पर्यवेक्षकांनी उपकेंद्रांना भेटी देऊन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेणे. ‘हलचल रजिस्टर’वर नोंदी करूनच मुख्यालय सोडणे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ‘ड्रेस कोड’ नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. जैविक घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे. जनआरोग्य समितीच्या सभा नियमित घेणे. कुपोषित अंगणवाडीतील बालकांची तपासणी करून, श्रेणीनुसार वर्गीकरण करून आवश्यक असल्यास ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील NRC केंद्रावर भरती करण्याच्या सूचना. टेलिकन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत योग्य नियोजन करणे. गरोदर मातांना प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात नियमित सेवा देणे. पत्ता सिझनमध्ये स्थलांतरित लोकांची आरडीके (RDK) किटने मलेरियाबाबत तपासणी करणे. अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी व आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे. या  बाबींवर भर देण्यात आला.

या भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र घरतकर, डॉ. स्नेहल गायकवाड यांच्यासह आरोग्य संस्थेतील संपूर्ण स्टाफ व कर्मचारी वर्ग, ज्यात आरोग्य सहायक सुरेश पारधी, आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, फार्मासिस्ट मुकुल बडवाईक, स्टाफ ब्रदर चिरायू वावरे, आरोग्य सेविका प्रमिला रॉय, आरोग्य सेवक सय्यद, परिचर बंडू उईके, स्वच्छक कुमुद शहारे आदी उपस्थित होते. या पाहणीमुळे अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button