
वाहतूक कोंडी व अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न ; नगर पंचायतीची जेसीबी कारवाई
भामरागड : शहरातील पोलीस स्टेशन ते पर्लकोटा नदीकाठी आणि मुख्य चौकापर्यंतच्या रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. या अतिक्रमणांमुळे रस्ते अपघातही वाढत असल्याने, अखेर नगर पंचायत प्रशासनाने आज, सोमवार, १६ जून रोजी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. या मोहिमेत अतिक्रमित दुकानांसमोरील शेड व इतर बांधकामे हटवण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.
भामरागड शहरात मागील दोन वर्षांपूर्वीही अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकेक दुकानदारांनी आपापल्या दुकानासमोर शेड वाढवून चक्क रस्त्यावरच दुकाने थाटली होती. नगर पंचायतीने वारंवार सूचना देऊनही दुकानदार ऐकत नसल्याने, अखेर प्रशासनाने कठोर कारवाईचा मार्ग स्वीकारला. मोहिमेपूर्वी सर्व दुकानदारांना त्यांची दुकाने स्वतःहून हटविण्यास सांगून नोटीस बजावण्यात आली होती.
सध्या पर्लकोटा नदीवर एका मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकाम कामासाठी विविध प्रकारचे साहित्य पोहोचवण्यासाठी मोठ्या ट्रकची वाहतूक वाढली आहे. अशा परिस्थितीत दुकानदारांनी मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे दुकाने उघडल्यामुळे वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे आणि त्यांच्या पथकाने जेसीबीच्या मदतीने सर्व अतिक्रमित दुकाने हटवली.
नगर पंचायतीचा हा उपक्रम चांगला असला तरी, काही नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. “मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवलेले चालते, परंतु गोरगरीब टपरी चालवत असतील तर नेहमीच नगर पंचायत जेसीबी चालवते,” अशा प्रतिक्रिया देत काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. असे असले तरी, शहर स्वच्छ आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.



