गडचिरोलीविदर्भ

रेगडी-घोट मार्गावरील खड्डे आणि अरुंद रस्त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची मागणी

अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा मानवाधिकार संघटनेचा इशारा ; एटापल्ली, मुलचेरा, भामरागडसह छत्तीसगडला जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग, तरीही दुर्लक्ष कायम

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी-घोट मार्ग हा सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला हा मार्ग अनेक ठिकाणी खड्डेमय आणि अरुंद असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या तातडीने रुंदीकरण आणि नूतनीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेने केली असून, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

एटापल्ली, मुलचेरा आणि भामरागड या तालुक्यांतील नागरिकांसाठी जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी रेगडी-घोट हा जवळचा मार्ग आहे. अलीकडेच देवदा पुलियाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ स्थानिकच नव्हे, तर छत्तीसगड राज्यात जाण्यासाठीही अनेक नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्ता अरुंद असल्याने आणि जागोजागी मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांनी या मार्गावर आपले जीव गमावले आहेत.

लॉयड मेटल सूरजागड प्रकल्पातील काही मालवाहू वाहने आणि कंपनीच्या डिझेल गाड्याही तालुक्यात जाण्यासाठी ‘शॉर्टकट’ म्हणून याच मार्गाचा वापर करतात, ज्यामुळे रस्त्यावरील ताण आणखी वाढला आहे.

महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी या गंभीर समस्येकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी तातडीने या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, युवा नेते शुभंकर चक्रवर्ती, सुमेन विश्वास, प्रशांत शहा, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका अध्यक्ष कालिदास बान्सोड, आणि महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखा सिन्हा यांनी संबंधित विभागाला या मार्गाबाबत तातडीने माहिती देऊन नूतनीकरणाची मागणी केली आहे.

संबंधित मार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण न केल्यास रेगडी-घोट भागातील विविध समस्यांना घेऊन विराट जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button