
भाजपच्या सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या कटिबद्धतेचा दाखला; भाजप नेत्यांची उपस्थिती
देसाईगंज : ओबीसी समाज संघटना, तालुका देसाईगंज यांच्या वतीने रविवार, २२ जून रोजी दुपारी १२ वाजता हटवार मंगल कार्यालय, देसाईगंज येथे ओबीसी मेळावा तथा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. केंद्रातील भाजप सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी घेतलेल्या ऐतिहासिक जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भव्य स्वागत करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा निर्णय भाजपच्या सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या कटिबद्धतेचा एक महत्त्वपूर्ण दाखला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
गेली अनेक वर्षे विविध समाज संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षांच्या वतीने जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा विविध स्तरांवरून जोरदार पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या मागणीची दखल घेत हा धाडसी आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय देशातील मागास वर्ग, बहुजन, आदिवासी व इतर घटकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या सोहळ्यात भाजपच्या व इतर पक्षाच्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे सोहळ्याचे मानकरी होते. तसेच, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची उपस्थिती ओबीसी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक होती.
या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार कृष्णा गजबे यांची उपस्थिती विशेषत्वाने अधोरेखित करते की, भाजप नेहमीच सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील राहिली आहे. गजबे यांच्यासारख्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून या मागणीला पाठिंबा दिला होता आणि आता त्यांच्याच पक्षाने ही मागणी पूर्णत्वास आणली आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. देसाईगंज येथील हा ओबीसी मेळावा आणि अभिनंदन सोहळा भाजपच्या सर्वसमावेशक धोरणांचे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरला. ओबीसी समाज संघटना, तालुका-देसाईगंज यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहकुटुंब उपस्थिती दर्शविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार मानले.



