
भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोंघा गावात बुधवारी (दि. १८ जून) दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या तलावाजवळ मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या सचिन सेवकराम धुर्वे (३१) या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आपल्या नऊ मित्रांसोबत गावाजवळील तलावावर पार्टी करण्यासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर मित्रांना पोहण्याची इच्छा झाली. सचिनही पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. त्याच्या अन्य मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. सचिन बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी गावात दिली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला, परंतु यश आले नाही. गुरुवारी सकाळी त्याचे प्रेत तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन धुर्वे याच्या पश्चात त्याचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कुटुंबातील एकुलता एक कमावता व्यक्ती गेल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.



