क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली पोलिसांना मोठे यश : ६ लाखांचे बक्षीस असलेल्या माओवादी उपकमांडरला अटक

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली ७ दिवसांची पोलिस कोठडी

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांच्या विरोधातील लढ्यात मोठे यश मिळवले आहे. कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करत असलेल्या आणि ६ लाख रुपयांच्या बक्षीस असलेल्या जहाल माओवादी उपकमांडरला पोलिसांनी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने २७ जून रोजी अटक केली.

अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (वय २८, रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली) अटक करण्यात आलेल्या माओवादीचे नाव  असे आहे. तो कोरची दलममध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता.

पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, मन्नू सुलगे पल्लो हा १ मे २०१९ रोजी जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भूसुरुंग स्फोटात सक्रिय सहभागी होता. या स्फोटात १५ पोलिस जवानांचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर आजपर्यंत तीन चकमकी आणि दोन खून असे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दलममधील कार्यकाळ 

२०१२ ते २०१७: निब कंपनी (छत्तीसगड) येथे सदस्य, २०१७: भामरागड दलममध्ये सदस्य, २०१७ ते २०२०: कोरची दलममध्ये उपकमांडर, २०२० पासून: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती कवंडे जंगल परिसरात सक्रिय

२७ जून रोजी भामरागड उपविभागातील कवंडे जंगल परिसरात विशेष अभियान पथक, पोस्टे कवंडेचे पोलिस पथक आणि सीआरपीएफ ३७ बटालियनच्या सी कंपनीच्या संयुक्त पथकाने माओवादविरोधी अभियान राबवले. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याची ओळख मन्नू सुलगे पल्लो अशी पटली. तो कवंडे जंगल परिसरात घातपात घडवण्याच्या उद्देशाने रेकी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

महाराष्ट्र शासनाने मन्नू सुलगे पल्लो याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण १०४ माओवादी अटकेत आले आहेत.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, आणि पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मन्नू सुलगे पल्लो यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, माओवाद्यांवर कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. ही कारवाई गडचिरोली पोलिस दलाच्या माओवादविरोधी अभियानातील मोठे यश मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button