
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांची पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट ; दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यावर भर
गोंदिया : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत “स्टॉप डायरिया” अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी दिली आहे. ग्रामपंचायतींमध्ये पाणी शुद्ध करून व निर्जंतुक करून पिल्याने जलजन्य आजार टाळता येतील, याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
“स्टॉप डायरिया” अभियान अंतर्गत ग्रामीण जनतेला पावसाळ्यात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने १७ जून रोजी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देऊन कामाची पाहणी केली.
या भेटीदरम्यान जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. तनया चौधरी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी भाग्यश्री सोनी, आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी उपस्थित होते. डॉ. अग्रवाल यांनी स्त्रोतापासून ते पाणी शुद्धीकरण प्रकल्प किंवा जलशुद्धीकरण केंद्र व घरातील नळापर्यंत ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आरोग्य संस्थेकडून प्रयोगशाळेत येणाऱ्या पाणी नमुन्यांच्या तपासणीस विलंब होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, प्रयोगशाळेत येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.
प्रयोगशाळेत दूषित पाण्याचे नमुने आढळल्यास संबंधित आरोग्य संस्था व तालुका आरोग्य अधिकारी यांना तात्काळ सूचना देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यानंतर, डॉ. अग्रवाल यांनी काही जलसुरक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणींची माहिती घेतली. जिल्हा प्रयोगशाळेतील अनुजैविक तज्ञ भारती पटले यांच्याशी पाणी नमुना तपासणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणत्याही ठिकाणी दूषित पाण्यामुळे जलजन्य साथरोग होणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले.



