गडचिरोलीनागपूरविदर्भ

गडचिरोलीहून नागपूरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेत भीषण स्फोट

आ. संजय मेश्राम यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गोंडबोरी फाट्याजवळील घटना ; कोणतीही जीवितहानी नाही

भिवापूर : गडचिरोलीहून नागपूरकडे रुग्ण घेऊन निघालेल्या शासकीय १०८ रुग्णवाहिकेला शनिवारी (ता. २८) दुपारी उमरेड-भिवापूर मार्गावरील गोंडबोरी फाट्याजवळ अचानक आग लागून भीषण स्फोट झाला. चालकाने प्रसंगावधान राखत रुग्ण आणि नातेवाईकांना सुखरूप बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली.

रुग्णवाहिकेत (एमएच १४ सीएल ०५१७) असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आग भडकली आणि सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण वाहन जळाले. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. घटनेची माहिती मिळताच भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल पोलिस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

घटनेनंतर पोलिस विभागाने तात्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे १०८ रुग्णवाहिकांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाहनांमधील ऑक्सिजन सिलिंडर आणि त्याच्या सुरक्षा प्रणालीची तातडीने तपासणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.

उमरेड मार्गावरील गोंडबोरी फाट्यानजीक रुग्णवाहिकेत झालेल्या स्फोटाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे स्फोटके असावीत, असा संशय व्यक्त करत आमदार संजय मेश्राम यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेबाबत आमदार मेश्राम म्हणाले की, “आज नागपूरमध्ये काही व्हीव्हीआयपींच्या भेटी आयोजित होत्या. अशावेळी रुग्णवाहिकेत स्फोट होणे हा केवळ अपघात नसून, त्यामागे काही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची सखोल चौकशी व्हावी.” पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button