
गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र-सोनापूर, गडचिरोली यांच्या वतीने बोदली येथे नुकताच शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना धान आणि तूर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी तसेच हवामान आधारित पीक व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. किशोर कि. झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी शेतकऱ्यांकडून सद्यस्थितीतील पीक परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी धान आणि तूर पिकाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खत व्यवस्थापन, तणांच्या सुयोग्य व्यवस्थापनाकरीता उगवणपूर्व तणनाशकांचा वापर तसेच कीड व रोग व्यवस्थापनाकरीता शिफारशीत कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. विक्रम कदम, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी जनावरांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देताना सांगितले की, पावसाळ्यात गायींचे तसेच शेळी व कोंबड्यांचे लसीकरण करणे गरजेचे असून, त्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून लसीकरण करणे आवश्यक आहे.
सुचित के. लाकडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी अधिक आर्थिक नफा मिळवण्यासाठी धान पिकाबरोबरच बांधावर आंबा, चिकू, लिंबू, सीताफळ, जांभूळ, आवळा इत्यादी फळपिकांची लागवड करावी, असे सांगितले. तसेच भाजीपाला पिकांमध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी, चवळी इत्यादी पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला.
नरेश बुद्धेवार, विषय विशेषज्ञ (कृषी हवामानशास्त्र) यांनी हवामान आधारित खरीप पिकांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दर मंगळवार व शुक्रवारी प्रकाशित होत असणाऱ्या पीक सल्ल्याचा जास्तीत-जास्त वापर करण्याचे आवाहन केले, जेणेकरून वातावरणामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळता येईल व शेतकऱ्यांना योग्य पीक व्यवस्थापन करता येईल.
या कार्यक्रमाला बोदली येथील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



