गडचिरोलीविदर्भ

डॉ. देवराव होळींच्या जनता दरबारात स्थानिकांच्या समस्यांचा पाऊस; घरकुल, नोकरी आणि आधार केंद्राबाबत निवेदने

डॉ. होळींनी दिले समस्या सोडविण्याचे आश्वासन 

गडचिरोली : भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात सोमवार, ७ जुलैला आयोजित जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपल्या विविध समस्या आणि तक्रारी मांडल्या. नागरिकांनी घरकुल, नोकरी आणि आधार केंद्राबाबत निवेदने दिली. डॉ. होळी दर सोमवारी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करतात, ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी नागरिकांनी अनेक महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधले. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणींसोबतच, आदिवासी विभागातील अधिपरिचारिका भरती प्रक्रियेत स्थानिक गोंडी आणि माडिया बोलीभाषा येणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य न देता, बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांना संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यामुळे स्थानिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचे सांगत, स्थानिक बेरोजगार युवतींना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. चामोर्शी येथील आधार नोंदणी किट ९ ते १० वर्षांपासून जुने झाल्याने ते निष्क्रीय झाले आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, आधार कार्डमध्ये दस्तऐवजानुसार बदल करतानाही दस्तऐवज अस्पष्ट होत असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे आधार सेवा केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.

डॉ. होळींकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन

डॉ. देवराव होळी यांनी निवेदनधारक नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. त्यांनी संबंधित विभागांच्या प्रमुखांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या समस्या तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. होळी करत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि नागरिक मोठ्या आशेने आपले प्रश्न मांडण्यासाठी या दरबारात येत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button