
गडचिरोली: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कार्यरत कृषी विज्ञान केंद्र-सोनापूर, गडचिरोली यांच्या वतीने चुरमुरा येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर सुरकर यांच्या शेतावर प्रत्यक्ष धान पिकाची पुनर्लागवड करण्यासंदर्भात शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक आणि योग्य लागवड पद्धतीची माहिती मिळाली.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. किशोर कि. झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांकडून सध्याच्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी धान आणि तूर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खत व्यवस्थापन, तणांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी उगवणपूर्व तणनाशकांचा वापर, तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
याच दरम्यान, धान पिकाची पुनर्लागवड करतेवेळी शेतकऱ्यांच्या लागवडीच्या पद्धतीमधील चुका निदर्शनास आणून, प्रत्यक्ष २० x १५ सें.मी. अंतरावर व पट्टा पद्धतीने धान लागवड करून घेण्यात आली. त्याचप्रमाणे, बांधावरील तूर लागवडीमधील चुका लक्षात आणून, प्रत्येक ठिकाणी १ किंवा २ रोपे आणि दोन रोपांतील अंतर २ फूट नागमोडी पद्धतीने करून घेण्यास उपस्थित शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या पद्धतीचे फायदेही शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. विक्रम एस. कदम (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), पुष्पक ए. बोथीकर (विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण), सुचित के. लाकडे (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या), आणि नरेश पी. बुध्देवार (विषय विशेषज्ञ, कृषी हवामानशास्त्र) यांनीही उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.



