
अर्जुनी मोरगाव येथे १५ जुलै रोजी बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी
गोंदिया : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया आणि शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव येथे ‘व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन’ तसेच ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचे उद्योजक, नियोक्ते आणि प्लेसमेंट एजन्सी सहभागी होणार आहेत, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना थेट कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण, आयटीआय धारक, कोणत्याही शाखेतील पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची तसेच व्यवसाय मार्गदर्शनाची ही एक सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथील नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथील दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० किंवा gondiyarojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रा. ना. माटे यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.



