
माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते विशेष सन्मान ; समाजसेवेचे जागतिक पातळीवर कौतुक
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र, निष्ठावान समाजसेवक आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची ‘पॅरामाउंट्स अचिव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय संस्थेत मानाची निवड झाली आहे. ही निवड केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक, नैतिक व प्रेरणादायी उंचीची जागतिक स्तरावर दखल घेतली गेल्याचे प्रतीक आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाची लहर पसरली असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निमित्ताने भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोली येथे विशेष सन्मान सोहळा पार पडला. डॉ. खुणे यांच्या कार्याचा गौरव करत माजी खासदारांनी त्यांना पुष्पगुच्छ देत विशेष कौतुक केले. यावेळी डॉ. नेते म्हणाले, “डॉ. प्रणय खुणे यांचे हे यश गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजसेवेसाठी समर्पितपणे झटणाऱ्या कार्यकर्त्याला मिळालेला हा सन्मान जिल्ह्यातील युवकांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. त्यांचा संघर्ष, चिकाटी व कार्यपद्धती ही आजच्या तरुण पिढीला दिशा देणारी आहे.”
‘पॅरामाउंट्स अचिव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ही संस्था समाजात असामान्य, प्रेरणादायी आणि कल्याणकारी कार्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचे योगदान जगापुढे मांडते. या मान्यतेसाठी निवड होणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कार्याची विशिष्ट ओळख आणि जागतिक स्वीकार होय.
डॉ. प्रणय खुणे यांनी गडचिरोलीसारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त व दुर्गम भागात गेली अनेक वर्षे सातत्याने आणि समर्पितपणे समाजसेवा केली आहे. ते दुर्गम गावांमध्ये जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेतात आणि ते शासन दरबारी प्रभावीपणे मांडतात. मानवाधिकार, आरोग्य, शिक्षण, न्याय आणि मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी सातत्याने लोकजागृती, सहाय्य आणि नेतृत्व केले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.
“ही निवड माझ्या वैयक्तिक कार्याची नाही, तर गडचिरोलीच्या जनतेच्या विश्वासाची आणि सहकार्याची फळ आहे,” अशी नम्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी अधिकारी, कार्यकर्ते तारेंद्र बोरडे, राहुल भाऊ, तसेच इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
डॉ. प्रणय खुणेंचं हे यश गडचिरोली जिल्ह्यासाठी केवळ सन्मान नव्हे तर प्रेरणादायी दीपस्तंभ आहे – त्यांनी दाखवलेला सेवापंथ हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख आहे.



