
विकासकामे रखडल्याने नागरिकांना अडचणी; सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन
गडचिरोली : आरमोरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासनिक यंत्रणा अपुरी असल्याकडे आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी विधान भवनात लक्ष वेधले. मतदारसंघातील २ नगरपरिषद आणि २ नगरपंचायत येथे मुख्याधिकारी पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने नागरिकांना विकासकामांबाबत तसेच दैनंदिन शासकीय सेवांबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मसराम यांनी राज्य सरकारकडे या रिक्त पदांवर तात्काळ मुख्याधिकारी नेमणुकीचे आदेश देण्याची ठाम मागणी केली. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज वेगवान होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मतदारसंघातील जनतेतून व्यक्त होत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांना होणारा त्रास कधी थांबणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



