गडचिरोलीत सागवान तस्करांना दणका : २.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक

मुलचेरा तालुक्यातील खुदिरामपल्ली येथे वन विभागाची कारवाई; आरोपींना २४ जुलैपर्यंत वन कोठडी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाने सागवान तस्करीविरोधात धडक कारवाई केली आहे. मुलचेरा तालुक्यातील खुदिरामपल्ली येथे २१ जुलै रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास वन विभागाने सापळा रचून सागवान तस्करी प्रकरण उघडकीस आणले. या कारवाईत २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यात ७ सागवान लाकडी ओंडके (किंमत: ४२,५०० रुपये) आणि मारुती सुझुकी एलएक्स डोन वाहन (किंमत: २,५०,००० रुपये) यांचा समावेश आहे. वन विभागाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, चामोर्शी न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
पेडीगुडम वनपरिक्षेत्र कार्यालयाला २० जुलै रोजी जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी एन. एस. वाडीघरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश बोडा, एम. व्ही. कोकणारे, चौकीदार असीम तालुकदार आणि दामोदर पेंदाम यांनी खुदिरामपल्लीच्या नाल्यावर सापळा रचला.
रात्री १०:३० वाजता मारुती सुझुकी एलएक्स डोन (MH 38-2233) वाहनाची तपासणी केली असता, त्यात ७ सागवान लाकडी ओंडके (लठ्ठे) आढळून आले. वाहनचालक उत्तम शामल दास (वय ३४) आणि अरुण अधीर गाईन (वय ३३), दोघेही खुदिरामपल्ली येथील रहिवासी, यांनी येलचिल आणि बेलगुर जंगल परिसरातून लाकूड आणल्याची कबुली दिली. वन विभागाने मध्यरात्री १:४५ पर्यंत पंचनामा आणि जप्तीची कारवाई पूर्ण केली.
दोन्ही आरोपींना २१ जुलै रोजी चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईने जिल्ह्यातील तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
यापूर्वी जून २०२५ मध्ये पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील गोमणी उपक्षेत्रात अवैध वृक्षतोड प्रकरण गाजले होते. याप्रकरणी वनपाल एन. टी. सिडाम आणि वनरक्षक सचिन मस्के यांच्यावर वन सुरक्षा, प्रशासकीय जबाबदारी आणि चुकीची माहिती सादर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई झाली होती. आता पुन्हा सुंदरनगर बिटात सागवान तस्करी उघडकीस आल्याने या भागात अवैध वृक्षतोड आणि तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फर्निचर मार्ट असल्याने सागवान तस्करीला प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा आहे. या कारवाईनंतर पुढील तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वन विभागाने अवैध तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.



