उपजिविका विकास कार्यक्रमामुळे एटापल्ली तालुक्यात रोजगाराच्या संधी वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने एटापल्ली तालुक्यात ४.९५ कोटींचा प्रकल्प सुरू; १५०० कुटुंबांना लाभ, जीवनमान उंचावण्याचे ध्येय
गडचिरोली/मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आणि कॉर्पोरेट फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने गडचिरोली जिल्ह्यात बाएफ (BAIF) द्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांमुळे या परिसरातील स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास पोषक वातावरण निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि या भागात समृद्धी आणणे हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने बाएफ संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत, ज्यात स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या आकांक्षित तालुक्यातील २० गावांमध्ये ‘समन्वित उपजिविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रायोजक संस्था एसबीआय (SBI) फाउंडेशन असून, १ एप्रिल २०२५ पासून पुढील तीन वर्षांपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी एकूण ४.९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यामध्ये १५०० लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहेत.
या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्ये निवडलेल्या गावांमध्ये हवामान सुसंगत आणि शाश्वत शेतीला चालना देणे, उपजिविकेच्या संधी वाढवणे आणि जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण व समृद्धी साधणे ही आहेत. ही उद्दिष्ट्ये हवामान सुसंगत व शाश्वत शेतीचा प्रसार, बोडी आधारित शेती प्रणालीचा प्रसार, मृदा व जलसंधारण, जलस्रोत विकास, बोडीमध्ये अंतर्गत मत्स्यपालन, महिला उद्योजकता विकास व संस्था निर्मिती, समुदाय आरोग्य, स्वच्छता व पोषण खालील प्रमुख उपक्रमांद्वारे साध्य केली जातील:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागातील समुदाय कल्याणास विशेष लक्ष दिले असून, २०२५-२६ या वर्षासाठी ३० जून २०२५ पर्यंत ५०० कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, १५ बोडी (नैसर्गिक शेतीतलाव) गाळमुक्त करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतीसाठी उपयुक्त पाणीसाठा वाढवण्यास मदत झाली आहे. बोडी आधारित शेती पद्धतीत माशांचे संगोपन, बोडीवर कुक्कुटपालन आणि बोडीतील पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो. ही पद्धत पाण्याचा कार्यक्षम वापर करते आणि विविध उपजिविका स्रोत निर्माण करते.
२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पात सहभागी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट होईल, शेती उत्पादकता वाढेल, उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील, शेतकरी गटांच्या माध्यमातून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्याला कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने बाएफ संस्थेमार्फत कृतीशील प्रतिसाद मिळत असल्याचे प्रेरणादायी चित्र गडचिरोली जिल्ह्यात बघायला मिळते आहे.



