गडचिरोलीविदर्भ

‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत १०५० युवकांना कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र वितरित

एआय (Artificial Intelligence) प्रशिक्षणाची लवकरच सुरुवात ; युवकांना स्पर्धात्मक युगात यशासाठी मार्गदर्शन

गडचिरोली : जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रात (स्किलिंग इन्स्टिट्यूट) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 1050 युवक-युवतींना गुरुवार, २४ जुलै रोजी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडलेल्या या समारंभात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या हस्ते प्रशिक्षणाथांना पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेवलपर, वेब डेवलपर, चारचाकी वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. सन 2024-25 या वर्षात एकूण 35 सत्रांमध्ये आयोजित या प्रशिक्षणात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 1050 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आतापर्यंत एकूण 1380 युवक-युवतींनी या संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे.

यावेळी बोलताना गोकुल राज जी. यांनी मेहनत, चिकाटी आणि ध्येय साध्य करण्याची जिद्द हेच यशाचे गमक असल्याचे सांगितले. तसेच, येत्या काळात गडचिरोली पोलीस दल आपल्या स्किलिंग इन्स्टिट्यूटमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणार असून, त्यात अधिकाधिक युवक-युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी आणि नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button