गोंदियाविदर्भ

डॉ. मिताली सेठी यांची राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्राला भेट : कुपोषित बालकांच्या आरोग्य स्थितीचा घेतला आढावा

आरोग्य सेवा सक्षम करण्याचे निर्देश

गोंदिया : महाराष्ट्र राज्य आदिवासी आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी (भाप्रसे) यांनी त्यांच्या गोंदिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्राला (NRC) भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी गंभीर तीव्र कुपोषण (SAM) असलेल्या बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा आणि त्यांच्या पोषण स्थितीचा सखोल आढावा घेतला. त्यांच्यासोबत भारतीय प्रशासन सेवेतील खुश (भाप्रसे), साई किरण (भाप्रसे), आणि राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (महिला व बालकल्याण) दिग्विजय शिंदे उपस्थित होते.

NRC हे कुपोषित बालकांना वैद्यकीय आणि पौष्टिक उपचार पुरवणारे एक महत्त्वाचे युनिट आहे. कुपोषणामुळे मुलांची वाढ खुंटणे, अशक्तपणा आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवतात.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) अंतर्गत कमी वजनाच्या बालकांना NRC मध्ये संदर्भित करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. वाहनांचा तुटवडा आणि शेती किंवा पत्ता हंगामासारख्या कामांमुळे पालक मुलांना NRC मध्ये दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सेठी यांनी कुपोषणविषयक समस्या, NRC मधील बालकांची वजनवाढ, अंगणवाडी, आशा सेविका आणि RBSK पथकांमार्फत होणारा फॉलोअप, ओपीडी रेफरल आणि बालविकास विभागामार्फत पोषण ट्रॅकरद्वारे बालकांना भरती करण्याच्या पद्धतींचा आढावा घेतला. कुपोषित बालकांना NRC मध्ये भरती करून आरोग्य सेवा सर्व स्तरांवर अधिक सक्षम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. NRC मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही मुलांना वेळेवर आणि योग्य आहार मिळावा यासाठी माता-पालकांना समुपदेशन व सहाय्य देण्यावर त्यांनी भर दिला.

या दौऱ्यावेळी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग आणि शिक्षण विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवन राऊत, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार कटरे यांचा समावेश होता.

एनआरसी भेटीप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत चांदेकर व दर्शन चौधरी, बालरोग तज्ञ डॉ. देशमुख, डॉ. तुरकर व डॉ. दिपाली, आहारतज्ञ स्वाती चव्हाण, मेट्रन अर्चना वासनिक, स्टाफ नर्स स्वाती बावणकर व ज्योती उके, कुक सारिका तोमर, परिचर श्रद्धा मेश्राम उपस्थित होते. हा दौरा गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागांमधील आरोग्य सेवांचे वास्तव जाणून घेण्यासाठी आणि आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button