गडचिरोलीत ५ हजार कुटुंबांसाठी ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आकांक्षित तालुक्यांचे सक्षमीकरण हेतू अॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रिय सहभाग, २०.३४ कोटी रुपयांची तरतूद ; ४९ गावांना मिळणार लाभ
गडचिरोली/मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात जिल्ह्यातील ४९ गावांचा समावेश असून, यासाठी अॅक्सिस बँक फाउंडेशन सक्रिय सहभाग देत आहे. १ जानेवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांकरिता २०.३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यातून सुमारे पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. या धोरणाला प्रतिसाद देत अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत हा उपजीविका विकास कार्यक्रम सुरू झाला आहे. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, उपजीविकेच्या संधींमध्ये सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि समुदायाचे कल्याण साधणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजिविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजिविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल.
प्रकल्पाच्या सुरुवातीपासून (३० जून २०२५ पर्यंत) या उपक्रमात २,००० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तिकरण करण्यात आले असून, त्यामुळे त्यांची जलधारण क्षमता वाढली आहे. बोडी आधारित शेती प्रणाली, ज्यात माशांचे संगोपन, कुक्कुटपालन आणि बोडीतील पाण्याचा शेतीसाठी वापर यांचा समावेश आहे, ही पद्धत पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेती उत्पादकतेत वाढ करते आणि ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देते.



