
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या पद्धतीने होणाऱ्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, 25 जुलै रोजी गडचिरोली पोलीस स्टेशन आणि कारवाफा येथील पोलीस मदत केंद्राच्या पथकांनी संयुक्तपणे धानोरा तालुक्यातील नवेगाव येथे 8 अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 1,84,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाफा पोलीस मदत केंद्राला नवेगाव, ता. धानोरा येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशन आणि कारवाफा पोलीस मदत केंद्राच्या पथकांनी संयुक्तपणे मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान, कारवाफा येथील पोलीस पथकाने पायी गस्त घालत नवेगाव येथे पोहोचून कारवाई केली. झडती घेतली असता, पथकाने 99,400 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. याव्यतिरिक्त, 85,000 रुपये किमतीची गावठी दारू आणि गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे हातभट्टी साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले.

या कारवाईप्रकरणी 8 आरोपींविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (इ) आणि 65 (एफ) अंतर्गत 8 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रभुदास शिशु गावडे (40), पंचफुला सुरेश नरोटे (42), मनिषा केशव तुमरेटी (50), निलिमा वसंत तुमरेटी (35), दिलीप शिशु गावडे (32), अशोक तुळशिराम पदा (47), जैराम बुधाजी गावडे (58), आणि परसुराम पांडुरंग तुमरेटी (44), सर्व रा. नवेगाव, ता. धानोरा अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, कारवाफा जगदीश पांडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मारबोनवार, पोहवा संजय पोल्लेलवार, पोहवा प्रेमकुमार भगत, पोहवा गुलाब कामतकर, तसेच कारवाफा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता शिंदे आणि इतर अंमलदारांचा समावेश होता.



