गडचिरोलीविदर्भ

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची बांबू प्रकल्पाला भेट

सहकारी तत्त्वावर रोजगार निर्मिती; बांबू लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

गडचिरोली : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी नुकतीच गडचिरोली येथील बांबू प्रकल्पाला भेट दिली आणि प्रकल्पाची पाहणी केली. गडचिरोली एम.आय.डी.सी.मध्ये गौण वनउपज बांबूवर प्रक्रिया करून बांबू फ्लोअरिंग टाइल्स आणि फर्निचर बनवण्याचा देशातील हा पहिला सहकारी तत्त्वावरील प्रकल्प आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळालेला हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून रोजगारनिर्मितीचा प्रयत्न करत आहे.

मंत्र्यांनी प्रकल्पाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच गडचिरोली जिल्हाही वन-आधारित कच्च्या मालावर प्रक्रिया करून पर्यावरणपूरक उद्योगातून समृद्ध होऊ शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास प्रतिवर्षी एकरी १.५ ते २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाची संकल्पना मांडणारे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या कार्याचे मंत्र्यांनी कौतुक केले. अशा प्रकल्पांमुळे गडचिरोलीतील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा उद्योगांना शासनाकडून मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी संस्थेतर्फे मंत्री डॉ. उईके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, संचालक ॲड. गजानन दुगा, प्रा. दौलत धुर्वे, सीईओ विनायक वाढीवा, भाजपा युवा मोर्चाचे अनिल तिडके, पंकज खोबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button