
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी महामार्गावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या वेदनादायी घटनेनंतर जखमींना तातडीने नागपूरला पुढील उपचारांसाठी पाठवण्यासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीने आपले हेलिकॉप्टर उपलब्ध करून देत माणुसकीचा परिचय दिला.
अपघातातील जखमींवर सुरुवातीला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता, त्यांना नागपूर येथे अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यकता असल्याचे कळताच, लॉयड्स मेटल्सने विलंब न लावता स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. त्यामुळे जखमींना लवकरात लवकर नागपूरला पोहोचवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य झाले.
लॉयड्स मेटल्सने यापूर्वीही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतेच, २ ऑगस्ट रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलीस नाईक राहुल गायकवाड यांना स्वतः हेलिकॉप्टरने हेडरी येथून नागपूरला उपचारांसाठी पोहोचवले होते. कंपनीच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणिवेमुळे गडचिरोली परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याने अनेक महत्त्वाचे जीव वाचू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



