
९ ऑगस्ट रोजी नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने ; १७ ऑगस्ट रोजी गोंदियात मेळावा
गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी नागपुरात ‘महाराष्ट्रवादी और विदर्भ विरोधी चले जाओ’ या नावाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आणि विदर्भातील विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्यात सरकारला आलेले अपयश, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. चटप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रावर सध्या ७ लाख ८२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सप्टेंबरपर्यंत हे कर्ज सुमारे ९ लाख ८३ हजार ७८७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या आर्थिक दिवाळखोरीमुळे सरकार विदर्भाचा ७५ हजार कोटी रुपयांचा सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रांतील अनुशेष भरून काढण्यास पूर्णपणे असमर्थ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण आणि बेरोजगारीसारख्या समस्या सुटणे शक्य नाही.
विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचे अॅड. चटप यांनी सांगितले. बेरोजगारीमुळे वाढता नक्षलवाद आणि तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती आवश्यक आहे. घटनेच्या कलम ३ नुसार केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याच मागणीला अधिक तीव्र करण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी नागपुरात आंदोलन आणि त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी गोंदिया येथील यशोदा सभागृहात ‘विदर्भ निर्माण संकल्प मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पूर्व विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. चटप यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर (मरकाम), दक्षिण गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जुम्मन शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



