
काँग्रेसच्या कुणाल पेंदोरकरांनी उघड केली धक्कादायक परिस्थिती ; आरोग्याची समस्या ऐरणीवर, आरोग्य सेवेबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप
गडचिरोली : जिल्ह्यात मलेरिया आणि इतर आजारांनी थैमान घातले असताना, आरोग्य विभागाची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोरच ‘गटारगंगे’चे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे आरोग्याची समस्या आणखी गंभीर बनली आहे. काँग्रेसच्या असंघटित कामगार कर्मचारी सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षावर कठोर टीका केली आहे.
पेंदोरकर यांनी सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शेजारीच जिल्हा शल्यचिकित्सकांचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर पाऊस आणि गटाराचे पाणी साचून डबक्याचे स्वरूप आले आहे. कर्मचाऱ्यांना याच पाण्यातून ये-जा करावी लागते. यामुळे डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पेंदोरकर यांनी सवाल केला की, “जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाचीच अशी अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची काय अवस्था असेल?” या परिस्थितीमुळे केवळ कर्मचारीच नव्हे, तर कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे आरोग्य विभाग नागरिकांना पाणी साचू न देण्याचा आणि मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोरच ‘गटारगंगा’ वाहत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. यातून प्रशासनाची आरोग्यसेवेबद्दलची अनास्था दिसून येते, असा आरोप पेंदोरकर यांनी केला आहे.



