
मलेरियापासून बचावासाठी ‘मच्छरदाणी‘ वापराचे प्रात्यक्षिक ; ताडपल्लीत ‘मुक्तिपथ‘ची मोहीम
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली गावात मुक्तिपथ शक्तीपथ स्त्री संघटनेची बैठक उत्साहात पार पडली. गावाचे पाटील नामदेव कंगाली यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुक्तिपथचे तालुका संघटक किशोर मलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मलेरियापासून बचावाचे उपाय, तसेच गावातील अवैध दारूविक्री आणि तंबाखूचे दुष्परिणाम कसे थांबवता येतील, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत ‘धोक्याचा मलेरिया’ आणि ‘गावात आलंय शक्तीपथ’ ही दोन गाणी सामूहिक पद्धतीने म्हणत उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात आले. मलेरिया आजाराची लक्षणे आणि उपचारांची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली. मलेरियापासून दूर राहण्यासाठी नियमितपणे मच्छरदाणीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच, मच्छरदाणीचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही दाखवून देण्यात आले.
आजाराची लक्षणे आढळल्यास लगेच आशा वर्कर किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच, मलेरिया बाबू किंवा ग्रामपंचायतीला गावात फवारणी करण्याची विनंती करण्याचे आवाहनही करण्यात आले. या चर्चेतून ‘मलेरियामुक्त गाव’ करण्याचा संकल्प घेण्यात आला. या बैठकीत महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवरही चर्चा झाली. महिलांची शारीरिक कमजोरी आणि महिला संघटनेचे महत्त्व यावर बोलताना ५५ महिलांना आरोग्यविषयक ‘टॉनिक’च्या गोळ्या देण्यात आल्या.
यावेळी आशा कार्यकर्ती वनिता धर्मा मटामी, आरोग्य सेविका बी. एम. लेकामी आणि व्ही. के. कंगाली यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.



