
शास्त्रज्ञांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
गडचिरोली: शेतातील गाजर गवताच्या वाढत्या समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोलीतील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र-सोनापूरने मौजा बोदली येथे ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद व गाजर गवत निर्मूलन सप्ताह’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात शास्त्रज्ञांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर कि. झाडे, सरपंच आकाश निकोडे, प्रगतशील शेतकरी गणपत पंदीलवार, श्रीराम मोहुर्ले, राजेंद्र निकुरे, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) पुष्पक ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. प्रितम एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) सुचित के. लाकडे उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी गाजर गवतामुळे पिकांच्या वाढीवर होणारे दुष्परिणाम आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी गाजर गवत निर्मूलनाचे सोपे आणि प्रभावी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवले. गाजर गवत केवळ पिकांनाच नाही, तर माणसांमध्येही अनेक रोग निर्माण करतो, याबद्दल त्यांनी जागरूकता निर्माण केली.
या कार्यक्रमात केवळ गाजर गवतावरच नव्हे, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावरही भर देण्यात आला. उद्यानविद्या विशेषज्ञ सुचित के. लाकडे यांनी शेतकऱ्यांना केवळ धान पिकावर अवलंबून न राहता, बांधावर आंबा, शेवगा यांसारखी फळपिके आणि वांगी, मिरची, टोमॅटो यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘गाजर गवत निर्मूलन प्रात्यक्षिक’ होय. शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतातून गाजर-गवत काढण्याचे प्रात्यक्षिक केले. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षरित्या ही पद्धत कशी वापरता येते, हे समजले. यावेळी त्यांनी धान आणि तूर पिकांची पाहणी करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाविषयीही मार्गदर्शन केले. बोदली गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन तो यशस्वी केला.



