कोपर्शी जंगल परिसरात चकमक ; चार माओवाद्यांचा खात्मा

तीन महिला माओवाद्यांचा समावेश ; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या कोपर्शी जंगलात गडचिरोली पोलिस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० आणि सीआरपीएफची १९ पथके सोमवारी कोपर्शी जंगलात शोधमोहिमेसाठी रवाना झाली होती. दोन दिवसांच्या पावसानंतर ही पथके बुधवारी सकाळी परिसरात पोहोचताच, दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमारे आठ तास चालली. चकमकीनंतर केलेल्या शोधमोहिमेत चार माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या भागात अजूनही काही माओवादी लपले असण्याची शक्यता असल्याने माओवादविरोधी अभियान सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



