गडचिरोलीच्या महिला खेळाडू संभाजीनगर येथील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत दाखवणार कौशल्य

माजी खा. डॉ. अशोक नेते यांचा पुढाकार व प्रेरणादायी पाठबळ
गडचिरोली : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषदेच्या संलग्नतेने गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेतून निवड झालेले १२ महिला आणि पुरुष खेळाडू आता संभाजीनगर येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
माजी खासदार आणि भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी या खेळाडूंच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आपल्या निवासस्थानी सर्व पात्र महिला खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी आर्थिक मदतही केली, ज्यामुळे त्यांच्यामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत १० ते ५५ वयोगटातील ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांनी ट्रेडीशनल, फारवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्वीस्टिंग, हॅण्डबॅलन्स, लेग बॅलन्स, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर आणि सुपाइन अशा १० प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवले. यातूनच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी २८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्नेहा रत्नाकर वाणी (ट्रेडीशनल, लेग बॅलन्स), शीतल व्यंकटरमण येल्लेवार (ट्वीस्टिंग), अश्विनी नत्थूजी ढेगळे (फॉरवर्ड बेंडिंग), दैशाली सोमेश धुडसे (सुपाईन), विशाल माधवराव भांडेकर (ट्रेडीशनल, लेग बॅलन्स), ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील रमा अरविंद भैसारे (सुपाईन), चंदा दिलीप ठेंगे (ट्रेडीशनल, बॅकवर्ड बेंडिंग), सुप्रिया रिलेश निखाडे (ट्वीस्टिंग), दीपिका विजय बोन्देलवार (लेग बॅलन्स). तर ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील वसुधा विनोद बोबटे (ट्रेडीशनल, बॅकवर्ड बेंडिंग), वर्षा प्रवीण मोडक (लेग बॅलन्स), धनराज धोन्डूजी कांबळे (ट्रेडीशनल). या १२ खेळाडूंची निवड झाली आहे.
हे सर्व खेळाडू एन.आय.एस. योग प्रशिक्षक डॉ. अनिल एन. निकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉ. अशोक नेते, त्यांचे प्रशिक्षक, पालक आणि कुटुंबीयांना दिले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या या खेळाडूंवर सर्व स्तरातून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



