
गोंदिया : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या ‘मोबाइल कर्करोग तपासणी व्हॅन’द्वारे २८ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, भानपूर येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण २०९ नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टपासून ही व्हॅन जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतील ३३ आरोग्य संस्थांमध्ये तपासणी करत आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांनी सांगितले की, भानपूर येथील शिबिरात एकूण २०९ तपासण्या झाल्या. त्यात १५९ मुख कर्करोग, ३० गर्भाशय कर्करोग आणि २० स्तन कर्करोगाशी संबंधित तपासण्यांचा समावेश होता.
या व्हॅनमध्ये एसी तपासणी कक्ष असून, मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप आणि स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा उपलब्ध आहे. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चिंधालोरे, मुखरोग तज्ज्ञ डॉ. प्रनब शेखर आणि शल्यचिकित्सक डॉ. डहाके यांच्या टीमने तपासण्या केल्या. तसेच, पुढील उपचारांसाठी संशयित रुग्णांना मार्गदर्शनही करण्यात आले.
या यशस्वी शिबिरासाठी डॉ. अमर खोब्रागडे आणि डॉ. तुळशी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि आशासेविकांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या सदस्य अंजली अटरे, सरपंच सरिता कटरे आणि इतर मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन अधिकाधिक नागरिकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.



